Skip to main content

आमची साऊ डॉक्टर झाली म्हणून....


प्रिय डॉ. साऊ,

आज ही पदवी तुझ्या नावासमोर बघताना ऊर अभिमानाने भरून आलाय.  कागदोपत्री तू जरी आज डॉक्टर झाली असलीस तरी आमच्यासाठी तू खूप वर्षांपासून डॉक्टरच आहेस.  मी तुला केव्हापासून डॉक्टर साऊ म्हणतोय मला आठवत नाही.  तेव्हा ते अनऑफिशिअल होतं.  यापुढे मीच नाही तर अख्खी दुनिया तुला डॉक्टर सायली या नावाने ओळखेल आणि तेसुद्धा ऑफीशिअली.  आज आपल्या पूर्ण घराचं इतक्या वर्षांपासून असलेलं एक मोठं स्वप्न पूर्ण झाल्याचं मी सगळ्यांच्या डोळ्यात पाहिलं.  अगदी स्वतःच्या सुद्धा!

आज जेव्हा संध्याकाळी मिटिंगला असताना अप्पांचा दादाला फोन आला तेव्हा ही गुड न्यूज ऐकून आम्हा दोघांचेही डोळे पाणावले होते.  मिटिंग अर्धवट सोडून आमचं लक्ष फोनवरच होतं.  समोर बसलेल्या क्लायंटना सुद्धा आम्ही अभिमानाने सांगितलं की आमची बहीण एम.बी.बी.एस झाली.  मिटिंग संपल्यावर थकलेलो असतानासुद्धा आमची पावलं घराकडे न वळता जुईनगरला वळली.  त्यात तुझ्याबद्दलच प्रेम होतं आणि महत्वाचं म्हणजे तुझ्याबाबतीतला अभिमान होता. तुला आणि अप्पा काकीला कधी बघतोय अस झालं होतं.  कदाचित जुईनगरला पोहचेपर्यन्त आमची छाती दोन इंच अजून पुढे आली होती.

या पूर्ण प्रवासाचा मी बऱ्यापैकी साक्षीदार.  म्हणजे अगदी अप्पा काकीच्या लग्नात टोकणा राहिल्यापासून, ते तुझ्या बालपणात तुझा मित्र म्हणून खेळण्यापर्यंत मी तुझ्यासोबत होतोच.  अप्पांना अगदी पाचशे रुपये पगार घेतानापासून मी पाहिलं आहे.  अप्पा-काकीच लग्न ठरलं त्यावेळी मी तिसरीत होतो.  काकी लग्न होऊन घरी येण्याआधीच माझा पहिला केक कापून बर्थडे तिने आणि नैना मावशीने चेंबूरच्या आपल्या घरी सेलिब्रेट केला आणि तेव्हापासून ती माझी फेवरेट झाली.  त्यामुळे त्यांचं लग्न झाल्यानंतर माझा बराच वेळ तिच्यासोबत गेला.  तुझ्या जन्मानंतर अप्पा-काकी काही वर्षे कुर्ल्याला असताना, त्यानंतर आर सी एफ मध्ये गेल्यावर, तिथून पुढे ऐरोली या सगळ्या ठिकाणी मी नेहमी राहायला यायचो.  मोठे मोठे डोळे असणारी तू तेव्हापासूनच क्युट सुद्धा होतीस आणि ऍक्टिव्हसुद्धा.  तुझे लहानपणापासून बरेचसे डान्स मी आवर्जून पाहिले.  तुझ्या सुरुवातीच्या सर्व बर्थडेमध्ये मी हिरीरीने भाग घेतला.  फुगे लावण्यापासून ते डेकोरेशन करण्यापर्यंत सगळं.  ते सगळे मोमेंट एन्जॉय केले.  तू अभ्यासात सुरुवातीपासूनच हुशार होतीसच आणि पहिला नंबर अगदी दहावीपर्यंत सोडला नाहीस.  तुझा शाळेतल्या दहावीच्या टक्क्यांच्या रेकॉर्ड अजून कुणी मोडू शकलं नाही हे ऐकून अजूनच अभिमान वाटला.

आपण सगळेच मोठे झालो व काही ना काही निमित्ताने आपले कॉन्टॅक्ट कमी झाले.  तू तुझ्या अभ्यासात बिजी आणि आम्ही आमच्या कामात.  साऊ डॉक्टरच होणार हे तू शाळेत असल्यापासूनच मी सगळ्यांकडून ऐकतोय.  बारावीला सुद्धा तू चांगले मार्क्स मिळवून एम. बी. बी. एस ला ऍडमिशन मिळवलस आणि त्याच क्षणी तू आमच्यासाठी डॉक्टर झालीस.  तुझं हे शिक्षण चालू असताना तर डिस्कनेक्ट अजून वाढला.  अभ्यासाच्या ताणामुळे तुला बाकी गोष्टीवर लक्ष देता आलं नाही.  बरेचशे सणसमारंभ तुला अटेंड करता आले नाहीत.  आम्ही जेव्हा जेव्हा सणाला घरी यायचो तेव्हा तुझी पुस्तक बघून मला टेन्शन यायचं.  मी तुला नेहमी मस्करीत म्हटलं की, तुझं एक पुस्तक हे आमचं अख्ख पोर्शन होत.  खरं तर  आमचीही इंजिनिअरिंगची पुस्तक अशीच जाड होती.  पण नोट्स मिळत असल्याने ती पूर्ण वाचण्याची तसदी घ्यावी लागली नाही.  तुला तुझी पुस्तक पूर्ण वाचावी लागतात ऐकून मला नेहमीच तुझं कौतुक वाटायचं.   ही पदवी मिळवण्यासाठी तुला किती मेहनत करावी लागली असेल याचा विचार न केलेलाच बरा.

या सगळ्या गोष्टींमागे अप्पा-काकीचीसुद्धा खूप मेहनत झाली.  दोघेही गरीब कुटुंबातूनच वर आलेले.  पण दोघांनी मेहनतीच्या जोरावर सगळं साम्राज्य उभं केलं.  खरं तर तू डॉक्टर व्हावीस हे स्वप्न त्यांचं.  त्यांनी लहानपणापासून तुलाच त्यांचं जग बनवून घेतलं.  प्रत्येक गोष्टीत तूच त्यांची प्रायोरीटी राहिलीस.  तू रात्रभर जागी राहून अभ्यास करत असताना तुझ्याबरोबर जागे असणारे अप्पा-काकी.  असे आई-बाबा माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिले.  अप्पांनी त्यांच्या आयुष्यात फक्त मेहनतच केली.  एन्जॉयमेंट करणं त्यांच्या लेखी खूप कमी आलं असेल किंवा स्वतःसाठी जगणं त्यांना माहीत नाही.  काकीनेसुद्धा एवढ्या ऑपरेशनमधून सावरून आता एवढ्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या सावरण खरंच खूप कौतुकास्पद आहे.  या पिरियडमध्ये अप्पा-काकीने किती गोष्टी टाळल्या असतील?  किती तडजोडी केल्या असतील?  मुलाची परीक्षा असतानासुद्धा घरात टीव्ही चालू असलेला मी पाहिला आहे.  तुझी परीक्षा चालू असताना त्यांनी घरात कोणतीच गोष्ट कधी एंटरटेन केली नाही.  अगदी पप्पांपासून ते त्यांच्या खास मित्रापर्यत कोणीही त्या काळात घरी येण्याची ईच्छा दाखवली की त्यांनी नकार दिला.  तो नकार देताना त्यांना कसं वाटत असेल याचा विचार न करता तू कुठेही डिस्टर्ब होऊ नयेस हाच त्यांचा हेतू.  तुझं शिक्षण ही त्या दोघांची निष्ठा होती आणि आज त्याचा रिजल्ट अख्ख्या दुनियेसमोर आहे.  तुझी अजून खूप मोठी स्वप्न आहेत आणि ती पूर्ण करण्याची ताकद तुझ्यात नक्कीच आहे.  अप्पा-काकीसारखे आई बाबा असताना अशक्य ते काय?

खरं तर आज संध्याकाळी खूप दमलो होतो आणि तुझी ही गोड बातमी मिळाली आणि थकवा गेला.  घरी आल्यानंतरसुद्धा आई-पप्पा मला प्रत्येक गोष्ट अभिमानाने सांगत होते.  अशावेळी त्यांचे आनंदाश्रू ते कितीवेळ लपवणार?  तुला शुभेच्छा देतानाही त्यांची वाट मोकळी झाली असेलच.  डॉक्टर झालीस म्हणून तुला काय गिफ्ट द्यावं हा विचार करत होतो तेव्हा तुझ्याबद्दल लिहावं अस वाटलं म्हणून हे सगळं मांडलं.  दिलेलं एखाद गिफ्ट कधी न कधी नष्ट होऊन जाईल पण हे लिखाण चिरकाल टिकेल.  कदाचित आपल्या पुढच्या पिढ्याही वाचतील आणि त्यांना आपल्या खानदानातल्या पहिल्या डॉक्टरचा कायम अभिमान वाटेल.  तुझ्या पुढच्या प्रत्येक यशासाठी आम्हा सर्वांकडून खूप खूप आशीर्वाद आणि एवढा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण तू आम्हाला दिलास त्याबद्दल धन्यवाद.  खूप मोठी हो.  जगातल्या टॉपमोस्ट स्पेशालिस्ट डॉक्टरमध्ये तुझं नाव टॉपला असेल हे नक्की.

लव्ह यु अँड प्राउड ऑफ यु अगदी मनापासून.

तुझाच,
बंधू

Comments

Popular posts from this blog

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"उद्योजकतेची दिवाळी"

  "पप्पा, मी यावर्षी पण कंदीलाचा बिजनेस करणार आहे", सार्थक मोठ्या उत्साहात परवा मला सांगायला आला. "कस्टमर कोण? अजय काका?", मी गमतीने विचारले.  गेल्यावर्षी बिजनेसच्या पहिल्या वर्षात अजय काका हा एकच कस्टमर होता. सार्थकला प्रोत्साहन म्हणून त्याने कंदील घेतले आणि पेमेंट म्हणून काही शेअर्स त्याला गिफ्ट म्हणून पाठवले. "यावर्षी अजय काकाला आम्ही पार्टनर म्हणून घेणार. प्रत्येक कंदीलामागे कमिशन देणार", सॉफ्टवेअरमध्ये बिजनेस डेव्हलपमेंटच काम बघणारा अजा, कंदील विकताना कसा दिसेल या कल्पनेने हसू आलं.  अजय काका सार्थकचा हक्काचा माणूस आहे.  आणि अजय काकाला पण सार्थकचं भारी कौतुकही आहे. "परीक्षा संपल्यावर सगळं", मी सार्थकला सांगितलं. आज परीक्षा संपवून घरी आला आणि अण्णासोबत जाऊन त्याने कंदीलाच सामान आणलं. अण्णाकडून मदतीच प्रॉमिस घेतलंच होतं. पार्टनरशिपची ऑफर टाकण्यासाठी अजय काकाला फोन करा म्हणून माझ्या मागे लागला होता. पण हे सगळं त्यानेच करावं हे त्याला मी सांगितलं. फोन लावून त्याच्याकडे दिला पण लाजत असल्याने तो धावत मम्मीकडे गेला. मम्मीनेही माझं बोलणं ऐकलं असल्याम