Skip to main content

युवोत्सव २०१८ आणि "जाणीव"


गेला दीडेक महिना फेसबुकवर युवोत्सव २०१८ ची जाहिरात चालू होती. गेली कित्येक वर्ष काही ना काही निमित्ताने आम्हाला सुतार समाजाचा कार्यक्रम अटेंड करता येत नव्हता. यावर्षी क्लासच्या वार्षिक स्नेहमेळाव्याला राकेश आवर्जून आला होता व निघताना त्यांनी तारीख आणि वेळ सांगून महिनाभर आधीच आमच्याकडून कमिटमेंट घेतली होती. सुशीलसुद्धा इव्हेंटमध्ये होताच त्याचा वेगळा फॉलोअप आणि त्यावर अजून संदेश फेसबुक मेसेंजरवर रिमाईंडर मेसेज टाकत होताच. "९० हुन अधिक कलाकार मिळून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते आपल्या जवळचे आहेत त्यामुळे वेळ काढून जाऊच", असं दादा आणि मी ठरवलं होतं. तरीसुद्धा एक कन्फर्मेशन म्हणून काल सकाळी राकेशने पुन्हा आठवण करून देण्यासाठी फोन केलाच.

संध्याकाळी काम लवकर आवरून दादा आणि मी एकत्र परेलला पोहचलो. दामोदर हॉलला आठचा कार्यक्रम होता आणि सव्वाआठ होऊन गेले होते. काउंटरला तिकीट्स असतील असं राकेशने मला व्हाट्सपवर सांगितलं होतं पण आमच्या नावाची तिकीट्स नव्हती. तिकीट्स विकत घेतली आणि जर आधीच घेतली असतील तर ती फुकट जातील म्हणून दादा आणि मी कन्फ्युजन मध्ये होतो. संदेशला फोन केल्यावर "सरळ पहिल्या रो मध्ये व्ही. आय. पी. सीट्सवर येऊन बसा", असं त्याने सांगितलं. कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या मागे म्युजीशिन्सचा आडवा सेट आणि पुढे कलाकारांना डान्स व नाटकासाठी मोकळी जागा अशी व्यवस्था होती. अप्रतिम प्रकाशयोजना, कॉश्च्युम्स, नृत्य आणि अभिनय यात प्रोग्रॅमने रंगत आणली. पूर्ण प्रोग्रॅमची थीम आई बाबांच्या आणि मुलांच्या नात्याबद्दल जाणारी होती आणि काही वेळा हसवत, काही वेळा इमोशनली इंटरवल होईपर्यंत खूप चांगला रंग आला होता. इंटरवलला निघण्याचा प्लॅन झाला. स्टेजवर जाऊन राकेश आणि सुशीलला भेटलो. पण ते दोघेही हक्काने प्रोग्रॅम संपेपर्यंत जायचं नाही अस सांगत होते.

"आता यापुढे काय आहे?", मी सुशीलला विचारलं.

"पंधरा वीस मिनिटं सत्कार आहे आणि नंतर पुढचा कार्यक्रम. जास्त नाहीये अजून", सुशीलने सांगितलं.

सत्कार वगैरे म्हटलं की कंटाळा येतो पण एवढ्या आग्रहाने सांगतायत तर थांबूया असा दादा आणि मी विचार केला. पडदा उघडल्यावर स्टेजच्या मध्ये स्क्रीन लावली होती आणि उजव्या बाजूला छोटा पोडिअम. निवेदकाने सत्कारमूर्तीची माहिती सांगायला सुरुवात केली. युवा सुतार प्रतिष्ठानची तरुण मुलं डोंबिवलीत उंभार्ली गावातल्या एका "जाणीव" नावाच्या वृद्धाश्रमाला भेट देऊन आली होती. तो वृद्धाश्रम मनोज पांचाळ सांभाळतात अस त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी स्क्रिनवर त्यांच्यासाठी बनवलेला व्हिडीओ दाखवण्यास विंनती केली. जेव्हा नाव अनाउन्स केलं होतं तेव्हा एखादा पन्नास साठीतला व्यक्ती असेल असा अंदाज होता पण जेव्हा क्लिप लागली तेव्हा कळालं की ही व्यक्ती जेमतेम आमच्याच वयाची होती. रेल्वेस्टेशन किंवा बसस्टँडवर रहाणाऱ्या वृद्ध माणसांशी संवाद साधून त्यांना स्वतःच्या वृद्धाश्रमात घेऊन येणं व त्यांची सेवा करणं अशा कामाचा विडा त्यांनी उचलला होता. डोंबिवलीमध्ये एका गावात तीस पस्तीस वृद्ध राहू शकतील अशा वृद्धाश्रमाची बांधणी त्यांनी पैसे स्वरूपात मदत न घेता वस्तू स्वरूपात घेऊन केली. त्यांची पत्नीही त्यांना यात मदत करते असं त्यात सांगितलं होतं. सध्या वीस बावीस वृद्ध त्यांच्याबरोबर आहेत. मला दोघांचाही अभिमान आणि कौतुक वाटलं. क्लिप संपली व स्टेजवर येण्यासाठी त्यांचं नाव अनाऊन्स झालं. मी इतका भारावून गेलो होतो की टाळ्या वाजवत उभं राहून त्यांना स्टँडिंग ओवेशन दिलं. अशावेळी माझ्याबरोबर कोण उभं आहे की नाही याचं भान मला राहील नव्हतं. पण कदाचित सगळ्यांनीच ते केलं असणार.

मनोज आणि त्यांच्या पत्नी स्टेजवर आले व त्या दोघांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आता मनोजना बोलण्याची विनंती केली गेली. मनोज या घरातल्या सरकाराने भारावून गेले होते. एरव्ही मला भाषण ऐकण्यात रस नसतो पण मनोज काय सांगणार हे मी कान देऊन ऐकत होतो. मनोज सध्याच्या मुलांची पालकाबाबतील वागणूक व मुलं त्यांना कशी वाऱ्यावर सोडून देतात हे सांगत होते.

"एकदा कल्याण स्टेशनला एक म्हातारी बाई अशीच बसलेली दिसली जीची साडी, चप्पल व पूर्ण पेहराव बघून ती खूप चांगल्या घरातली आहे हे जाणवत होतं. तिला खूप आग्रहाने विचारल्यावर तिने सांगितलं की मुलगा मला इथे सोडून तिकीट काढायला म्हणून गेला आणि ४ महिने झाले तरी आला नाही", बोलत असताना मनोज यांच्या डोळ्यातलं पाणी कायम होतं.

"एक म्हातारा व्यक्ती उकिरड्यावर राहायचा म्हणून त्यांना विचारलं तर 'इथे पोटभर खायला मिळतं म्हणून मी इथे राहतो' अस त्यांनी सांगितलं. म्हणजे आपण जे खाऊन चॉकलेटचे रॅपर फेकतो त्याला चिकटलेले उरलेल खाऊन ती व्यक्ती जगत होती", हे सगळं ऐकून माझ्या अंगावर काटा आला.

एकदा एक माणूस त्याच्या आईला सोडायला त्यांच्या वृद्धश्रमात आला. "आम्ही दोघेही दिवसभर घरी नसतो आणि त्यामुळे हिच्याकडे बघायला कुणाला वेळ नाही. तर तुम्ही तुमच्या अनाथ आश्रमात हिला भरती करून घ्या" अस त्याने सांगितलं. यावर दिलेलं मनोज यांचं उत्तर माझ्या मनाला खूप खोलवर भिडलं, "एकतर हा पेड वृद्धाश्रम नाही. आम्हाला ज्या व्यक्ती स्टेशनवर किंवा बसस्टँडवर भेटतात त्यांना आम्ही इकडे आणतो. जर माझ्यासारखा एक व्यक्ती ज्याचं या वृद्ध व्यक्तींशी काही नातं नाही तो २०-२२ आई बाबांना एकत्र सांभाळू शकत असेल तर तुम्ही दोघे नवरा बायको मिळून एका आईला नाही सांभाळू शकत? तो व्यक्ती निघताना रडला व सॉरी म्हणून निघून गेला."

"कधीकधी आपल्या घरातली रक्ताची नाती पण आपल्यावर उलटतात. एका बाईचा नवरा वारला म्हणून त्याची सगळी प्रॉपर्टी हिच्या नावावर झाली. त्याचे आई बाबा तिकडेच होते. त्याच वेळी तिच्या नवऱ्याच्या बहिणीचा डायवोर्स झाला आणि ती इकडे राहायला आली. पण या सुनेने अट घातली की जर तुला रहायचं असेल तर आई बाबांना घरातून बाहेर काढाव लागेल. रात्री बारा वाजता त्यांच्या सामानासकट आई बाबांना धक्के मारून दोघींनी घरातून बाहेर काढलं. आम्हाला ते एका स्टेशनला भेटले म्हणून आम्ही त्यांना वृद्धाश्रमात घेऊन आलो. मग आम्ही रीतसर पोलीस कम्प्लेंट करून त्यांना त्यांचं घर मिळवून दिलं", मनोज हे सांगत होते त्यावेळी आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी घडतात याचा अंदाजच नव्हता. मनोजने सांगीतलेल्यापैकी बरेच वयोवृद्ध हे चांगल्या घरातले होते.

यानंतर मनोज यांनी खूप महत्वाच्या मुद्द्याला हात घातला. "हे सगळं जे होतं ते आपलेच संस्कार मुलांवर असतात. आपल्या करिअरसाठी मुलांच्या अजाणत्या वयात आपण त्यांना पाळणाघरात टाकून देतो. मुलांसाठी अजिबात वेळ देत नाही आणि आयुष्यभर फक्त पैसे कमावण्याच्या नादात राहतो. मग शेवटी मुलंसुद्धा तेच करतात. ते एक चक्र पूर्ण होत असतं. आपण त्यांना पाळणाघरात टाकतो आणि ते आपल्याला वृद्धाश्रमात. माझ्याकडे आलेल्या बऱ्यापैकी आजी आजोबांचा हाच इतिहास होता. जेव्हा मी या कार्याची सुरुवात केली तेव्हा मला खूप विरोध झाला. स्वतःबरोबर पोरांना पण भिकेला लावशील इथपर्यंत बोललं गेलं. पण मी स्वतः अनाथ आश्रमात लहानाचा मोठा झाल्यामुळे मला हे दुःख कळत होतं. मी हे सगळं जॉब करता करता करतो. माझी बायको चांगली शिकलेली आहे. सुखवस्तू घरातली आहे. पण तीही ते सगळं विसरून या आजीआजोबांची सेवा करते", मनोजच प्रत्येक वाक्य काळजाला भिडत होतं. वेळेची कमी असल्याने त्यांनी भाषण आवरत घेतलं. भाषण संपल्यावर मी पुन्हा एकदा स्टँडिंग ओवेशन दिलं. पुढचा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा मस्त पार पडला. युवा सुतारच्या तरुण मित्रांनी अशा व्यक्तीला समोर आणलं म्हणून त्यांचं कौतुक वाटलं. कार्यक्रमाला फक्त सांस्कृतिक स्वरूप ना देता सामाजिक स्वरूप आणण्याचा त्यांचा विचार खरंच वाखाणण्याजोगा होता.

कार्यक्रम संपल्यानंतर निघताना डोक्यावर मनोज यांचं इम्प्रेशन कायम होतं. आम्ही भाऊ आमच्या आई बाबांच्या बाबतीत खूप इमोशनल आहोत त्यामुळेच कदाचित आम्हाला मित्रपरिवारासुद्धा तसाच मिळाला आणि अशा केसेस आमच्यासमोर कधी आल्या नाहीत. पण जे काही ऐकलं ते भयानक होतं. ट्रेन पकडल्यानंतर दादा म्हणाला, "बाबा आमटे, प्रकाश आमटे किंवा आता मनोज पांचाळ हे सगळे एकदम वेगळ्याच मातीचे बनलेले आहेत. आपल्यालापण असं काहीतरी करण्याची ईच्छा होते पण डेअरिंग होत नाही. कारण आपली प्रायोरिटी आपल्या फॅमिलिकडे येते. पण यांचं असं नसतं. यांच्यासाठी दुसऱ्यांची सेवा करणं ही प्रायोरिटी". खरं आहे. मनाचं मोठेपण बाहेरून आणता येत नाही. ते आतुन यावं लागत आणि ज्यांना याची "जाणीव" असते तेच असं कार्य निभावून नेतात.

धन्यवाद, सुबोध अनंत मेस्त्री ९२२१२५०६५६ #sahajsaral


Comments

  1. खूपच छान

    ReplyDelete
  2. खूप छान काम करतायत ते दादा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी