Skip to main content

संस्काराचे भजी


- सुबोध अनंत मेस्त्री

"आई तू पप्पाला मारायची भरपूर लहानपणी?", सार्थकने आईला प्रश्न केला.

"तुझा पप्पा काय पण सांगतो.  एवढी पण काय मारत नव्हते.  पोरं मस्तीच तेवढी करायची तर काय?  मोठे पप्पा (दादा) आणि अण्णा मस्ती करायचे.  हा नसायचा त्यांच्यात.  उगाच कायपण सांगत बसतात .  बायकांना खरं वाटायचं आधी यांच्या", आई कोणती गोष्ट कुठे जोडेल याचा नेम नाही.

"पण एकदा घरी कुणीतरी आलेल  आणि मोठे पप्पा आणि पप्पांना पैसे दिलेले.  त्यांनी जाऊन भजी खाल्लेली ना.", सार्थक मला चिडवत मोठमोठ्याने हसायला लागला आणि नंतर म्हणाला,"तेव्हा मारलेलास ते पप्पाला", पुन्हा हसायला लागला.  त्याला कधीतरी हे मी किंवा दादाने सांगितलं असेल

"तुला बरं हे सगळं आठवतं.  मारायलाच पाहिजे.  हावरेपणा केल्यावर मग काय?  म्हणून तुला पण सांगत असते कुणी काही दिल्यावर लगेच त्यांच्या समोर खायला घ्यायचं नाही किंवा कुणी काही देत असेल तर लगेच घ्यायचं पण नाही",  स्वतःवर डाव पलटलेला पाहून तो पुन्हा आपल्या वहीवर अभ्यास करण्यात रमला.  अभ्यास करताना असाच मध्ये काहीतरी विषय काढून टंगळ मंगळ करणं त्याच्यासाठी काही नवीन नाही.  

आयुष्यात काही क्षण ठळक लक्षात राहतात त्यातला हा एक.  आई-पप्पांनी आमच्यावर संस्कार करताना कधी कोणत्या गोष्टीची कमी ठेवली नाही.  कधी प्रेमाने समजावलं आणि ते ऐकलं नाही तर हातात मिळेल त्या वस्तूने. 

मी खूप लहान असतानाची ही गोष्ट.  कदाचित पहिली दुसरीला असेन.  त्यावेळी माझी कुणी चुलत मावशी आमच्या चाळीतल्या घरी आली होती.  पूर्वीच्या पाहुण्यांमध्ये एक पद्धत होती जी अजूनही दिसते.  ते घरी येताना खाऊ घेऊन यायचेच पण निघताना सुद्धा काही ना काही पैसे हातावर ठेवून जायचे.  त्यात आम्ही तीन भाऊ.  मग तिघांमध्ये त्या गोष्टींच्या वाटण्या व्हायच्या आणि नंतरच खायची परवानगी असायची.  या मावशीने निघताना मी लहान असल्याने माझ्या हातात 5 रुपयाची नोट ठेवली.  आता सहाजिकच तिघांमध्ये वाटणी होणं क्रमप्राप्त होत.  त्यावेळी नेमका अण्णा घरी नव्हता.  दादा आणि मी लगेच आनंदात घराच्या दरवाजावर आलो.  आईकडे पाहिलं सुद्धा नव्हतं.  बायकांचं निरोपाच संभाषण जवळपास अर्धा तास चालत राहत तस यांचंही चालूच होत.  ज्या काळात खाऊसाठी आमच्या हातात 20-25 पैसे यायचे तिथे एकाच वेळी 5 रुपये आल्यावर आम्ही दोघेही भारावून गेलो होतो.

"चल काहीतरी खाऊन येऊया", दादाने सुचवलं.  अशा भन्नाट आणि धडाडीच्या कल्पना दादालाच सुचू शकतात. 

आम्ही घरातून निघालो.  आमच्या चाळीबाहेर एक छोटा आडवा रोड लागतो तो पार केला की पुढे रोडला लागूनच एक चाळ आहे आणि  मग मोठा आडवा रोड जिथे मार्केट भरतं.  त्या ठिकाणी भगवती नावाच एक छोटं हॉटेल होत.  तिथे आम्ही दोघेही गेलो.   दादाने  कांदाभजी ऑर्डर केली आणि आम्ही दोघांनीही मिळून त्या गरमागरम कंदभाजीवर ताव मारला.  5 रुपये एकाच वेळेत संपले होते.  घरी कोणते भजी मिळणार याची आम्हा दोघांना थोडीसुद्धा कल्पना नव्हती.  घरी गेलो तेव्हा मावशी निघून गेली होती आणि आई रागातच होती.  मुळात समोरच्याने पैसे ऑफर केल्यावर लगेच पैसे का घेतले हा तिचा राग होता.  तिने आल्या आल्या आम्हाला तिचा राग बोलून दाखवला आणि पैसे गल्ल्यात टाकून ठेवायला सांगितले. 

"आई, मी आणि याने भजी खाल्ले", दादाने दबकून सांगितलं.
"सगळ्या पैशाचे?", आई अजूनच चिडली आणि आम्ही काही बोलत नाही बघून आम्हाला एका बाजूला उभं करून एक दोन वेळा पायावर पट्ट्या मारल्या.  आई अशी मारायला लागली की आम्ही आधीच मोठमोठ्याने ओरडायचो.  त्याने चाळीतली माणसं बाहेर येऊन बघायची.  आम्हाला वाटायचं की त्यातलं कुणीतरी मध्ये येऊन अडवेल.  पण कसलं काय?  चाळीतली मोठी माणसं बाहेरच्या बाहेर बघून मजा घ्यायची.  रडण्याचा आवाज वाढला की आई लाटणं बाहेर काढायची आणि "आवाज बंद कर नाहीतर घशात घालेन", अस बोलून तोंडासमोर लाटणं आणायची.  शांत नाही बसलो तर खरोखरच लाटणं घशात जाईल म्हणून आम्ही मुसमुसत रडत राहायचो.  त्या दिवशी आई खूपच चिडली होती.  "यापुढे जर अस वागलात तर तुम्ही आणि मी.  कुणी काही खायला आणलं तरी हावऱ्यासारखं त्यांच्यासमोर खायला घ्यायचं नाही.  पाहुणे गेले की मगच सगळ्यांनी वाटून खायचं". 

त्या दिवसानंतर केव्हाही कुणी पैसे द्यायला लागलं की "नाही" म्हणायची सवय लागली.  त्यात कुणी जबरदस्ती हातात टेकवलेच तर आधी आईकडे बघायचो आणि आईने होकार दिला तरच घ्यायचो.  पाहुणे गेल्यावर ते पैसे आधी आईकडे जायचे व नंतर त्यातून काही हिस्सा आमच्या वाट्याला यायचा.  पाहुण्यांनी काही खायला आणलंच तरी ते पाहुणे घरातून निघेपर्यंत वाट पाहायचो आणि मगच आईला विचारून खायला घ्यायचो.  असं आईने कधी मारलं की तिचा राग यायचा. पण आई पप्पांच मन हे आम्ही स्वतः त्या भूमिकेत गेल्यावर जास्त कळायला लागलं.  हल्ली मुलांवर काहीही कारणाने हात उठवणे म्हणजे ते त्या मुलांवर अन्याय केल्यासारखं दाखवल जात.  काही मुलांना त्यांचे पालक एवढे लाडावून ठेवतात की मुलांवर रागावणंसुद्धा त्यांना जड होऊन जातं आणि पुढे तीच मुलं हट्टी होऊन त्यांच्या नियंत्रणाबाहेर जातात. 


आमच्या आई पप्पानी आम्हाला लहानपणी खूप वेळा मारलं अस आठवत नाही पण जेव्हा जेव्हा मारलं ते कायम लक्षात राहील अस वातावरण तयार करून. त्यांचा धाक पण कायम राहिला आणि आदरयुक्त भीतीही.  आजच्या पालकांनी स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळताना हे करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे अस बऱ्याच वेळेला वाटून जातं.

=========================================

- सुबोध अनंत मेस्त्री
9221250656

#sahajsaral

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी