Skip to main content

दूरदर्शन आणि मी


संध्याकाळी माझ्या एका कामानिमित्त बेलापूर स्टेशनजवळ गेलो होतो इतक्यात एका अनोळखी नंबरवरून फोन वाजला.  संध्याकाळी ७ किंवा ७.३० ची वेळ असेल.  आजूबाजूला बराच गोंधळ असल्याने मला नीट ऐकू येत नव्हतं.  मी थोड्या वेळात कॉल करतो सांगून व समोरून "ठीक आहे" असं पुसटस ऐकू आल्यावर फोन कट केला.  नेमका फोन कुठून आलाय हे मला कळालं नव्हतं.
माझं काम झाल्यावर मी परतीच्या वाटेवर असताना पुन्हा त्याच नंबर वर कॉल लावला. 

"नमस्कार, थोड्या वेळापूर्वी आपला कॉल आला होता.  सॉरी तुमचा आवाज आला नाही म्हणून कट करावा लागला", मी फोन लागल्याबरोबर सांगण्यास सुरुवात केली. 

"नाही काहीच हरकत नाही.  मी निखिलेश चित्रे बोलतोय.  दूरदर्शनमधून", समोरून आवाज आला.  आता आवाज बऱ्यापैकी क्लीअर होता.

"नमस्कार निखिलेशजी बोला", मी त्यांच्या बोलण्यास दुजोरा दिला

"मी तुमचा ब्लॉग वाचला.  आम्हाला टेक्नॉलॉजी व सोशल मीडियासंदर्भात न्यूजमध्ये बोलण्यासाठी एका तज्ज्ञाची आवश्यकता होती.  तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये जे काही मांडलय ते तुम्ही न्यूज मध्ये सांगू शकाल का?", निखिलेशजींनी विचारलं

"हो का नाही", मी क्षणाचाही विलंब न करता त्यांना होकार दिला.

"पण उद्या संध्याकाळी ९.३० च्या बातम्यांसाठी तुमचा लाईव्ह कव्हरेज हवा आहे.  तुम्ही संध्याकाळी ८.३० पर्यंत येऊ शकाल का दूरदर्शन केंद्रामध्ये? आपली रिहर्सलसुद्धा होईल तेवढ्यात.  शक्य आहे का तुम्हाला?", निखिलेशजींनी विचारणा केली.  मी काही क्षण थोडा विचार केला.  तशा कामाच्या कमिटमेंट बऱ्याच होत्या.  पण त्यातल्या त्यात ती काम नंतर ही थोडं स्ट्रेच करून करता येण्यासाखी होती.  ही स्वतः चालून आलेली संधी मला अशी दवडायची  नव्हती. 

"हो, येईन मी.  संध्याकाळी दिलेल्या वेळेत पोहचेन", मी होकार कळवला.

"ग्रेट.  तुम्हाला पत्ता माहित आहे का?", निखिलेशजींनी विचारलं

"हो वरळी ना.  मी अरुण सरांबरोबर येईन", अरुण सरांची मुलाखत दूरदर्शनवर सतत होत असते आणि तिकडे त्यांची चांगली ओळख असल्याने दूरदर्शनवर आपल्या जीवनरंग टीमची मुलाखत घडवून आणेन असं ते नेहमी सांगत असतात व प्रयत्न करत असतात.  हेसुद्धा त्यांनीच घडवून आणलंय अशा आत्मविश्वासाने मी निखिलेशजींना सांगितलं.

"कोण अरुण सर?", निखिलेशजींनी विचारलं.

असा अनपेक्षित बाऊन्सर आल्यावर मला काहीतरी उत्तर देणं भाग होत. "त्यांच्याही  मुलाखती दूरदर्शन वर खूप वेळा झाल्या आहेत.  त्यांना तिकडचं सगळं माहित आहे.", असं सांगून मी वेळ सावरून नेली.  अरुण सरांनी नाही केलं मग रेफरन्स लागला कुठून हा प्रश्न मनात येणं साहजिकच होत.

"आपल्याला रेफरन्स कुठून मिळाला?  आय मीन माझा मोबाईल नंबर वैगेरे?", मी उत्सुकतेने विचारलं.

"मी नेटवर सर्च करत असताना मला तुमचा ब्लॉग सापडला.  मी पूर्ण वाचून काढला.  मला तो आवडला आणि त्यात काही पोस्ट खाली तुमचा नंबरसुद्धा होता.  ब्लॉगमध्ये खूप सुंदर प्रकारे तुम्ही तंत्रज्ञानाच्या व सोशल मीडियाबद्दल सगळ्या गोष्टी मांडल्या आहेत.  आपल्याला त्याच गोष्टी न्यूज मध्ये कव्हर करायच्या आहेत.", निखिलेशजींनी सांगितलं.

"ग्रेट.  मला आवडेल ते मांडायला", मी आनंदाने होकार कळवला.

"मग मी कन्फर्म समजू?", त्यांनी विचारलं

"हो हो.  काही प्रोब्लम नाही", मी पुन्हा होकार दिला

"ठीक आहे.  मी तुम्हाला इकडचा पत्ता आणि अपेक्षित मुद्दे पाठवून देतो.  उद्या संध्याकाळी भेटूच मग.  ८.३० ला पोहचा.  आणि प्लिज ग्रीन शर्ट घालू नका.  कारण तो मागच्या ग्रीन कपड्यामध्ये मर्ज होतो.", निखिलेशजींनी  सुचवलं

"मग कोणता रेकमेंडेड आहे?', मी विचारलं

"ग्रीन सोडून कोणताही", त्यांनी सांगितलं

नंतर धन्यवाद वैगेरे औपचारिकता होऊन फोन कट केला.  एक क्षण मला भरून पावल्यासारखं झालं.  दादाच  वाक्य आठवलं, "Give the world best you have and best of the world will come back to you".  म्हणजे इतके दिवस मी माझं तंत्रज्ञानातल नॉलेज लोकांना व्हाटसप किंवा ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करत होतो  त्याचा फायदा इथे या रूपात झाला तर.  "जे पेरणार ते उगवणारच" या निसर्गाच्या उक्तीनुसार मी जे निस्वार्थीपणे पेरलं होत त्याचा हा मोबदला होता.  पण तरीही मी उत्साहात सगळ्यांना लगेच सांगण्याची चूक करणार नव्हतो.  काही मित्र मस्करीसुद्धा करतात याची कल्पना होती.  म्हणून आधी जाऊन फेसबुकवर निखिलेशजींची पूर्ण माहिती पहिली तर खरोखरच ते दूरदर्शनमध्ये काम करत होते.  म्हणजे तो कॉल दूरदर्शनवरून आलेला हे कन्फर्म झालं.  मी लगेच विनोद दादा, गोविलकर दादा, अरुण सर, प्रतिभा, अजय अशा जवळच्या व्यक्तींना फोन आणि मेसेजेसच्या स्वरूपात कळवलं.  अजयने लगेच ग्रुप्सवर पोस्ट करायला सुरुवात केलीच होती पण मी त्याला अडवलं.  मला आधी ९.३० च्या बातम्या बघायच्या होत्या.  नक्की एकाचीच मुलाखत असते कि ग्रुपमध्ये  चर्चा असते? किती वेळ दिसेन? वैगेरे अशा गोष्टी मला कन्फर्म करायच्या होत्या.  मी वेळेवर घरी आलो.  आई पप्पाना गुड न्यूज सांगितली. ९.३० ला बातम्या लावून बसलो.  सुरुवातीला पहिल्या ब्रेकपर्यंत बातम्याच सुरु होत्या. 

"मुलाखत नेहमी असते का नक्की?", हा प्रश्न मी असाच बोलता बोलता बोललो.   

"हो असते.  खूप वर्षांपासून चालू आहे.  आम्ही बघायचो घरी ९.३० च्या बातम्या", प्रतिभाने सांगितलं

ब्रेक नंतर बातम्या सुरु झाल्या व त्यानंतर मुलाखत.  त्यादिवशी श्रीमती राऊत यांची पर्यावरणासंबंधी मुलाखत होती.  स्टुडिओचा लूक पाहून एकंदरीत मी भारावून गेलो. 

"उद्या यांच्याजागी मी असेन मुलाखतीला", मी आईकडे वळून अभिमानाने सांगितलं.  आईच्या डोळ्यात साहजिकच कौतुक होत.   तब्ब्ल १० मिनिट मुलाखत चालली व पुन्हा बातम्या सुरु झाल्या.   बातम्या संपल्याबरोबर मी निखिलेशजींना मेसेज करून कन्फर्म केलं कि ज्या पद्धतीत आता राऊत मॅडमची मुलखात झाली त्याच पद्धतीत माझी होणार का?  त्यांचं सकारात्मक उत्तर आल.   आता कुणाला सांगायला काहीच हरकत नव्हती.  खूप चांगला फुटेज मिळणार होता. 

अजय आणि प्रसादला मी मेसेजेस शूट करायला सांगितले.  मी सुद्धा माझा एक मेसेज बनवून माझ्या सर्कलमध्ये फॉरवर्ड केला.  सगळ्या ग्रुप्सवर आम्ही आवर्जून बघू असा फीडबॅक आला.  महाराष्ट्रभर इतक्या साऱ्या ट्रैनिंग केल्यानंतर, इतक्या वर्षाच्या आय-टी  क्षेत्रातल्या अनुभवाने, डिजिटल स्वरूपातल्या लेखणीने मला आता वेगळ्या स्तरावर आणून ठेवल्याची जाणीव झाली.   ३-४ दिवसांपूर्वीच आमच्या शाळेतल्या अनिल बोरनारे सरांची टीव्हीवर एका चर्चेसाठी येणार असल्याची पोस्ट पहिली होती.  त्यांना टीव्हीवर  पाहिल्यानंतर माझी स्वतःची खूप वर्षांपासूनची टीव्हीवर येण्याची ईच्छा  जागृत झाली होती.  पण त्यासाठी अजून खूप काम करायचंय असं स्वतःला समजावलं होत आणि काही दिवसातच हा फोन येण म्हणजे जीनला आपण आपली ईच्छा  सांगावी आणि "जो हुकूम मेरे आका" बोलून त्याने ती पूर्ण करावी असं काहीतरी झाल.
रात्री निखिलेशजींचा ऍड्रेस व मुद्द्यांसंबंधीचा मेसेज आला. 

"उद्याचा दिवस तुझा आहे.  या विषयावरच एक पोस्ट बनव.  सकाळी शूट करू आपल्या लाईफ रिचार्ज ग्रुपवर", संजय दादांनी सुचवलं.  आमच्या जीवनरंग संस्थेच्या लाईफ रिचार्ज  ग्रुपमध्ये प्रत्येक तज्ञ त्यांच्या विषयाच्या पोस्ट रोज सकाळी टाकत असतो व त्यावर चर्चा होते.  यातून नॉलेज शेअरिंग होतच पण एकमेकांचं उद्योग किंवा कामाचं स्वरूप सगळ्यांना कळत.  कुणाची मदत कुणाला कशी होईल हे सांगता येत नाही.  आणि आमच्या संजय दादांच मार्केटिंग किंवा एखाद्याला प्रमोट करण्याचं स्किल एम. बी. ए. विथ मार्केटिंग केलेल्या व्यक्तीला पण लाजवेल अस आहे.  रात्री उशिरापर्यंत त्यावर अजून काही माहिती मिळेल म्हणून अभ्यास करत बसलो. सकाळची पोस्ट रेडी करून दादांना पाठवली.   बोलण्यासारखं खूप काही होत पण तिकडे दिलेल्या वेळेत मुद्देसुतच सगळं होणं गरजेचं होतं.

सकाळी आमच्या व्हाट्सपच्या काही अभ्यासू ग्रुपवर अजून काही माहिती ऍड  करावीशी वाटते का म्हणून चर्चा केली.  माझी मुद्देसुत तयारी पूर्ण झाली होती.  पप्पा सकाळपासूनच सगळ्यांना कॉल करण्यात व्यस्त झाले होते.  सगळ्या गावामध्ये, त्यांच्या सगळ्या मित्रांना, आमच्या जुन्या चाळीत त्यांनी सगळ्यांना फोन फिरवले होते.  "पप्पांची सारखी रिपीट टेप चालू आहे बघ.", आई गमतीने म्हणाली कारण प्रत्येक फोन मध्ये पप्पा तसच आणि तेच तेच बोलत होते.

संध्याकाळी घरातून निघताना देवाला आणि आई-बाबांना नमस्कार केला. 

"पप्पा टीव्ही वर दिसला कि मला हात दाखव हा",सार्थकने सुचवलं.  मी हसत "हो" म्हणत त्याला मिठी मारली.  वेळेवर निघालो. प्रतिभा मला टिळक नगर पासून जॉईन करणार होती.  अरुण सर सुद्धा डायरेक्ट वरळी दूरदर्शन बाहेरच भेटणार होते.  त्यांना मी आवर्जून वेळ काढून यायला सांगितलं होत कारण त्यांना तिकडचा अनुभव होताच आणि ते असले कि एक मानसिक आधार वाटतो तो वेगळाच.
मुंबईच्या ट्रॅफिकचा अंदाज असल्याने आम्ही वेळेच्या अर्धा तास अगोदरच तिथे पोहोचलो.  अरुण सर आणि त्यांचे मित्र अनिल गवस तिथे आल्यानंतर आम्ही आत गेलो. 

"वहा किसे मिलना है पता है आपको?", अरुण सरांनी विचारलं.

"हा निखिलेश चित्रे नाम है", मी असं बोलणार तितक्यात निखिलेश २ व्यक्तीबरोबर मला समोरून येताना दिसले.  "यहि है शायद", मी अरुण सरांना उद्देशून म्हणालो

"आप मिले है उनसे?", अरुण सरांनी विचारलं.

"नही.  फेसबुक और व्हाट्सअप पे फोटो देख ली थी", मी हसत सांगितलं.  सोशल मीडिया चा हा एक फायदा झाला आहे.  व्यक्ती भेटण्याआधीच तिची बरीचशी माहिती आपल्याला आधीच मिळून जाते.

निखिलेश वळून आल्यावर "निखिलेश?" मी विचारलं

"हो. सुबोध?...या या... हे विनायक.  हे आजच बातमीपत्र सांगणार आहेत आणि तुमच्या मुलाखतीचं निवेदन करणार आहेत", त्यांनी निवेदकाशी माझी ओळख करून दिली.  मी सुद्धा प्रतिभा, अरुण सर आणि अनिल सरांची ओळख करून दिली. ते आम्हाला लिफ्टने दुसऱ्या माळ्यावरच्या एका केबिनमध्ये घेऊन गेले.  तिथे आम्ही सगळे एका सोफ्यावर बसलो.  विनायक आणि निखिलेश माझ्यासमोर असणाऱ्या खुर्चीवर  बसले.  ती केबिन बऱ्यापैकी मोठी होती.  मी माझा ब्लेजर एका खुर्चीवर लावून ठेवला.  आमची रिहर्सल सुरु झाली.  त्यात बऱ्याच गोष्टी ज्या मुद्द्यांमध्ये नव्हत्या त्यावरही चर्चा झाली.  एखाद्या अनोळखी व्यक्तीला डायरेक्ट मुलाखतीसाठी बोलावणे म्हणजे थोडा प्रेशर त्यांच्यावर साहजिकच होता.  पण आमच्या एकंदरीत चर्चेतून विनायक आणि निखिलेश दोघेही खुश झालेले दिसले.   निखिलेशजींच कामाच्या निमित्ताने सारख आतबाहेर चालूच होत. 

एकदा बाहेर गेलेले असताना विनायकजींनी निखिलेशबद्दल माहिती दिली.  त्यांच्याबद्दल काहीशी माहिती मी फेसबुकवर पाहिली होतीच.  या इतक्या तरुण वयात त्यांनी वेगवेगळ्या भाषेतलं बरच साहित्य वाचलं होत.  त्यांना सिनेमा बघण्याची खूप आवड आणि तोही कोणत्याही भाषेतला.  काही वेळा आठ-आठ दिवस सुट्टी काढून गावाला जाऊन दिवसाला ४ सिनेमे बघतात असं विनायक सांगत होते.  निखिलेशजींची स्वतः शूट केलेली शॉर्ट फिल्म "पठार" कान्स फेस्टिवल मध्ये सिलेक्ट झाल्याचं कळालं.  जिथे मोठं मोठे दिग्दर्शक ज्या ठिकाणी आपली कलाकृती दिसावी म्हणून तडफडत असतात तिथे निखिलेशजींची कलाकृती जाण खरोखरं अभिमानास्पद होत.

अजून बराचसा वेळ ९.३० साठी बाकी होता.  विनायक मेकअपसाठी निघून गेले.  तितक्या वेळात अरुण सरांनी दूरदर्शनचे मुख्य डॉ.कुमार यांना फोन लावला. अरुण सरांनी स्वतः बोलून नंतर फोन माझ्याकडे दिला.  तशी माझी आणि त्यांची काही ओळख नव्हती.  अरुण सरांनी फोनवर बोलतानाच "मेरे छोटे भाई जैसे है" अस माझ्याबद्दल  बोललेलं मी ऐकल होत.  फोन माझ्या हातात आल्यावर त्यांनी माझ्याशी जशी आमची खूप जूनी ओळख आहे असा छान संवाद साधला.  मला आत्मविश्वास दिला.  आपण नक्कीच लवकरच भेटू अस आश्वासन पण दिल. डॉ. कुमार यांची तब्येत बरी नसल्याने ते काही दिवस सुट्टीवर होते पण आवर्जून माझी मुलाखत पाहतील असा शब्द त्यांनी मला दिला.  मोठी माणसं बऱ्याच वेळी फक्त हुद्द्यानेच नाही तर मनाने सुद्धा मोठी असतात.

राजेश भाईंचा कॉल आला.  "हरप्रीतच्या नातेवाईकाच्या लग्नाचं रिसेप्शन आहे.  मी तिला सांगितलं जो पर्यंत बातम्या होत नाहीत आणि माझ्या सुबूला मी टीव्हीवर बघत नाही तोपर्यंत मी जाणार नाही", भाईंनी अभिमानानं सांगितलं.  हरप्रीत भाभीबरोबर सुद्धा फोनवर बोलणं झाल.  तिथे माझ्या मोबाईलला अशीही रेंज नसल्याने मला अरुण सरांच्या मोबाईलवर बोलावं लागत होत.  विनोद दादाचाही फोन येऊन गेला.  संजय दादांचा फोन प्रवासात असतानाच आला होता.  आज मी एक स्टार आहे अशी फिलिंग मला सगळे देत होते.  अरुण सर, संजय दादा आणि जीवनरंग मधले सगळे माझे सवंगडी रक्ताचं नातं नसतानासुद्धा व्यक्ती किती जवळची होऊ शकते याच जिवंत उदाहरण आहेत. 

थोड्या वेळात निखिलेशजी आले आणि चला मेकअप करून घेऊ असं त्यांनी सुचवलं.  मी गेलो तेव्हा विनायकचा मेकअप होत आला होता.  मी आल्यावर त्यांनी मला एका खुर्चीवर बसायला सांगितलं.  माझा मेकअप चालू असताना सुद्धा निखिलेशजी माझ्याबरोबर गप्पा मारत उभे होते.  पाहुणा आपल्या घरी आल्यावर आपण त्याची जितकी खातिरदारी ठेवावी किंबहुना त्याहीपेक्षा अधिक निखिलेशजिच्या वागण्यातून दिसत होती.  मला पुन्हा केबिनमध्ये सोडून ते निघून गेले. 

माझ्या बर्याचश्या ग्रुपवर आम्ही टीव्ही समोर बसलो आहोत असे मेसेज यायला सुरुवात झाली होती.  माझ्या मनात वेगळीच भीती कि नक्की हि मुलाखत लाईव्ह दिसणार का? नाहीतर एवढ्या लोकांचा हिरमोड व्हायचा.  विनोद दादा, गोविलकर दादा आणि माझ्या बऱ्याच मित्रांनी दिवसभर दर दोन-तीन तासांनी मेसेज टाकून लोकांना रिमाइंड केलं होत.  अगदी कार्यक्रम सुरु होण्याच्या १५ मिनिट आधी सुद्धा मेसेज आला होता.

९.३० वाजण्यासाठी १० मिनिट बाकी असताना निखिलेशजी बोलवायला आले.  बाजूलाच असणाऱ्या स्टुडिओमध्ये आम्हाला जायचं होत. 

"या न्यूज ला किती व्युव्हर असतात एका वेळी?" मी सहज विचारलं.

"८० लाखापर्यंत जातात", निखिलेशजीनी सांगितलं.  हे ऐकल्यावर पहिल्यांदा कुठेतरी मन अस्वस्थ झालं.  मी बरेच वेळा रंगमंचावर काम केलं, ट्रैनिंग घेतल्या, मुलाखती घेतल्या,  निवेदन केली, बिजनेस इव्हेंट होस्ट केले पण माझी मुलाखत देण्याची हि पहिली वेळ.  त्यात कुठे चुकल्यावर "कट" अस बोलून थांबवतील हि पण अपेक्षा नाही  कारण पूर्ण लाईव्ह कव्हरेज होत.  एडिटिंगलासुद्धा चान्स नाही.  प्रतिभा आणि अरुण सरांना सांगितलं, "तुम्ही तिथेच समोर बसा.  मला थोडा मॉरल सपोर्ट  मिळेल".   आत आल्यावर मी पाहिलं तेव्हा मी अपेक्षा केली होती तेवढा मोठा स्टुडिओ तो नव्हता.  एका रूममध्ये वर्गात असतो तसा छोटा स्टेज, त्यावर एक अर्धगोलाकार टेबल आणि त्याच्यामागे ३ व्हील चेअर.  मागच्या बाजूला हिरवा मोठा पडदा.  टेबलसमोरच ३ कॅमेरे आणि त्यात डाव्या बाजूच्या कॅमेराच्या बाजूला टेलिप्रॉम्प्टर.  निवेदक तिकडे बघून बोलत असतील याचा अंदाज आला.  निवेदकाच्या पाठच्या बाजूला एक टीव्ही होता जो मला सहज दिसत होता आणि एक टीव्ही कॅमेरा जवळ होता. जो विनायक व मला दोघांनाही दिसत होता.   दोन्ही टीव्हीवर बातम्या अगोदरची सीरिअल चालू होती. पण त्याचा आवाज येत नव्हता. आत मोजून २-३ माणसं होती.


विनायकजी आधीच त्यांच्या जागेवर जाऊन बसले होते.  मला त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर बसायला सांगितलं.  माझी अस्वस्थता माझ्या वागण्यातून थोडीफार दिसणं साहजिकच  होतं.  मी खुर्ची बसल्या बसल्या थोडीशी डाव्या-उजव्या बाजूला गोल फिरवायला लागलो.  ती मागे पुढे होणार नव्हती कारण तिची चाक खाली एका गोलाकार खड्ड्यात अडकवली होती.  माझी हि हालचाल पाहिल्यावर तिथे उभे असलेले कॉ-ओर्डीनेटर माझ्या जवळ आले आणि मला समजावत म्हणाले, "मुलाखत चालू होईल तेव्हा खुर्ची हलवू नका.  हाताच्या हालचालीही जास्त चालणार नाहीत.  नाहीतर बॉडीचा पोर्शन कॅमेरामध्ये कट होईल.  एक हात लांब करून टीव्हीमध्ये  बघा".  मी हात लांब केल्यावर खरोखरच माझा हात कट होत होता. 

"असे जादूगारीचे प्रयोग होतील", असं म्हणून ते हसले.  मीसुद्धा वर वर हसलो.  प्रत्यक्षात बाजू बाजूला दिसणाऱ्या त्या खुर्च्या टीव्ही मध्ये मात्र १०-१२ फूट अंतरावर लांब दिसत होत्या. त्यांनी मला मुलाखत चालू असताना कोणत्या कॅमेरामध्ये बघायचं ते सांगितलं.  म्हणजे निवेदकाशी बोलताना त्यांच्याकडे आणि प्रेक्षकांशी बोलताना त्या कॅमेराकडे.  मी सर्व समजून घेतलं.   त्यांनी मला माईक वैगेरे लावून माझ्याकडून माईक टेस्टिंग करून घेतली.  मधल्या वेळेत मी समोरच्या खुर्चीवर बसलेल्या प्रतिभा आणि अरुण सरांकडे पाहिलं.  प्रतिभाच्या डोळ्यातलं कौतुक ओसंडून वाहत होतच.  तिने या वेळेत माझे किती फोटो काढले असतील त्याची कल्पना तिलाच नसेल.  अरुण सरांनी थम्स अप करून ऑल दि बेस्ट दिल. दोन खुर्च्यांच्या मध्ये असणाऱ्या टेबलवर ग्लासमध्ये पाणी आणून ठेवलं होत.  घशाला कोरड पडली होतीच.

"पाणी पिऊन घ्या हवं तर. न्यूज चालू असताना पिता येणार नाही.", विनायकजींनी सांगितलं.   पाणी पिऊन ग्लास ठेवत असताना मी मुद्दाम टीव्हीकडे पाहिलं तर माझा हात माझ्याकडून कट होऊन विनायकजींच्या फ्रेममध्ये दिसत होता.  जास्त हालचालींनी जादूचे प्रयोग खरच होतील याची जाणीव झाली.  बातम्या चालू होण्याच्या २-३ मिनिट आधीच अरुण सर, प्रतिभा आणि अनिल सरांना वरच्या रूममध्ये बोलावणं आल तसे ते निघाले.  प्रतिभाने हतबल होऊन माझ्याकडे पाहिलं.  मी फक्त स्माईल दिली. 

"आपल्या मुलाखतीच्या अगोदर ब्रेक येईल का?", मला त्या वेळेत पाणी प्यायच होत म्हणून मी विनायकजींना विचारलं.

"होय, एक ब्रेक येईल",  त्यांनी सांगितलं. 

आता त्या रूममध्ये निवेदक, को-ओर्डीनेटर, कॅमेरामन आणि त्यांच्यासोबत नेहमीच काम करणारा तो कॅमेरा. सगळ्यामध्ये मीच या सर्वाना अनोळखी नवा पाहुणा.  माझ्या डोळ्यासमोर सारखा तो ८० लाखाचा आकडाच फिरत होता.  आता बातम्या चालू होण्यापूर्वीची ऍड टीव्हीवर दिसायला लागली.  अजून एखाद मिनिट बातम्या सुरु व्हायला बाकी होता.  माझी धडधड वाढायला लागली.  मी डोळे बंद केले आणि विचार करायला लागलो . "मी या गोष्टींना नवीन नाही.  जरी मला ८० लाख लोक बघत असतील तरी ते त्यांच्या त्यांच्या घरी आहेत. माझ्यासमोर फक्त हा एक निर्जीव कॅमेरा आहे जो माझ्या बोलण्यावर काहीच रिऍक्शन देणार नाही.  हजारो लोकांसमोर बोलताना जर माझे हातपाय थरथरत नसतील तर इथे ३-४ लोकांसमोर बोलण्यासाठी मला भीती का वाटावी? जे माझे सगळे जवळचे मला पाहतायत त्यांची माझ्याकडून अपेक्षा आहे कि मी हे निभावून न्यावं.  मिळालेल्या संधीच सोन करावं.  मी इथवर आलोय ते माझ्या आजपर्यंतच्या मेहनतीमुळे आणि माझ्या काही प्रमाणात झालेल्या सामाजिक योगदानामुळे.   दूरदर्शन मधून मला समोरून कॉल होता आणि माझ्यात काहीतरी वेगळेपण दिसलं म्हणून त्यांनी मला इथे बोलावलं होत.  इथे जे काही मी सांगणार आहे ते तथ्य आहे आणि लोकांच्या भल्याच आहे तेव्हा ते तितक्याच आत्मविश्वासाने लोकांसमोर गेलं पाहिजे.  कॅमेराला पण एक माणूस म्हणूनच बघायचं आणि फक्त गप्पा मारायच्या.  पुढे जे होईल ते होईल.", शांतपणे आमचं कुलदैवत, आई, बाबा, सार्थक, प्रतिभा, दादा, वाहिनी घरातले सर्व आणि संजय दादा, अरुण  सरांचं नाव मनातल्या मनात घेतलं.  आई बाबांना पुन्हा तिथूनच नमस्कार केला आणि सर्व आत्मविश्वासानीशी कॅमेराकडे पाहिलं.  भीती नाहीशी झाली होती.  
बातम्या सुरु झाल्या.  नॉर्मल बोलतानाचे विनायक आणि आताचे विनायक यांच्या टोनमध्ये खूप अंशी फरक होता.  ब्रेकनंतर मुलाखतीचा कार्यक्रम सुरु झाला आणि एखाद्या ठिकाणी गप्पा माराव्यात तस मी बिनधास्त तिकडे बोलायला लागलो.  प्रत्यक्षात विनायकजीनी सुद्धा खूप सांभाळून घेतलं.  मी अधून मधून बोलता बोलता घड्याळ पण बघत होतोच.  प्रत्यक्षात जिथे १० मिनिट मुलाखत चालणार होती ती १२ मिनिट चालली.  लाईव्ह न्यूज मध्ये सेकंदसुद्धा महत्वाचा असताना २ मिनिट एक्सट्रा मिळणं म्हणजे मोठी गोष्ट.  माझे सगळे प्रश्न व मुलाखत अगदी व्यवस्थित पूर्ण झाली.  पुन्हा ब्रेक झाला. मी उतरलो तरी चालेल असं मला कॉ-ओर्डीनेटरने सांगितलं.  त्यांच्या नजरेतली शाबासकी त्यांनी न बोलता मला मिळाली.  मी खाली उतरलो.  आता मनातली भावना खूप वेगळ्याच प्रकारची होती.  मी हे सर्व चांगलं निभावलंय हे मला स्वतःलाच कळालं होत.  निखिलेशजी स्टुडिओच्या बाहेर माझी वाटच पाहत होते.  त्यांच्याहि चेहऱ्यावरचं समाधान मला स्पष्ट दिसून येत होत.

"खूप सुंदर.  नेमक्या शब्दात गहन विषय मांडलात  सुबोधजी", निखिलेशजीनी माझं बाहेर आल्याबरोबर कौतुक केल. 

"धन्यवाद.  अरुण सर वैगेरे कुठे गेले?", मी विचारलं.

"हो ते वरच असतील.  कंट्रोलरूम मधून पाहत होते मुलाखत.  गोकाणी (प्रोड्युसर) साहेबांनीच बोलावलं बघायला त्यांना", निखिलेशजी सांगत होते.  गोकाणी सर अरुण सरांच्या खूप चांगल्या ओळखीतले.  अशी लाईव्ह मुलखात तिकडून कशी हॅन्डल होते हे सगळ्यांनी पाहावं अशी गोकाणी सरांची ईच्छा होती.




आम्ही तसेच वर कंट्रोल रूममध्ये गेलो पण ते सगळे मुलाखत संपल्याबरोबर खाली उतरले होते.   कंट्रोल रूम मध्येहि काही जणांनी मुलाखत चांगली झाल्याबद्दल माझं अभिनंदन केलं.  आम्ही पुन्हा खाली उतरलो.  सेकंड फ्लोर ला स्टुडिओ बाहेर हे सगळे आमची वाट पाहत होते.  कौतुक सगळ्यांच्या चेहऱ्यावर साहजिकच होत.  हा क्षण मला माझ्या आठवणीसाठी कैद करून ठेवायचा होता.  मी विनायक आल्यावर विनंती करून सगळ्यांचा एकत्र फोटो घेण्यास सांगितलं. 



"विषय खूप मोठा होता आणि तुम्हाला वेळ खरच खूप कमी मिळाला.  आपण लवकरच दुसरी मुलाखत अरेंज करू", निखिलेशजी सांगत होते. ऐकून बर वाटलं. 

एकत्र फोटो काढून झाल्यानंतर आम्ही निघालो.  खाली आल्याबरोबर अरुण सर म्हणाले, "सुबोध बहोत बढिया हुवा इंटरव्यू.  आपकी पहेली मुलाखत है ऐसे लगा हि नही". प्रतिभा खूष होतीच. 

काही खाजगी कामानिमित्त अरुण सरांना लगेच निघायचं होत.  लेट खूप झालेलं असल्याने घरी जेवूनच जावं लागणार होत.  अरुण सर आम्हाला हॉटेल दाखवून निघाले.  इतका वेळ माझा मोबाईल बंद होता.  चालू केल्याबरोबर मेसेजेस, मिस कॉल अलर्ट येण सुरु झालं.  म्हणजे या दरम्यान बरेच कॉल येऊन गेले होते.  ऑर्डर देताना मी मोबाईल बंद करून ठेवत होतो जेणेकरून मला प्रतिभाशी बोलता येईल.  पण "फोन चालू ठेव.  आपल्या जवळच्या सगळ्यांना तुझ्याशी आताच बोलायची ईच्छा होईल", प्रतिभाने सुचवलं.  मला ती गोष्ट पटली.  त्यानंतर शाळेतल्या शिक्षकांपासून, गावापासून सगळ्यांचेच कॉल येऊन गेले.  "आम्हाला तुझा खरच अभिमान वाटतो", हे वाक्य सगळ्यांचं कॉमन आणि ते मनापासून बोलतायत हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतच.  व्हाट्सअप वर तर अगणित अभिनंदनाचे मेसेजेस आले होते.  बरेच मित्र त्यांच्या पूर्ण कुटुंबाला घेऊन फक्त माझी मुलाखत बघण्यासाठी बसले होते.  अजयचा तर मेसेज आला कि त्याने घरात आलेल्या पाहुण्यांना रात्री मुलाखत संपल्यानंतरच जेवण वाढलं.  प्रतिभाच्या मामाने त्यांच्या गावात मोठी स्क्रिन लावून न्यूज पहिली अस समजलं.  सासरगावात जावयाची पत या मुलाखतीने कित्येक पटीने वाढली होती. 






पप्पाना कॉल केला, "पप्पा कशी झाली मुलाखत?", मी विचारलं
"मस्त म्हणजे खूप मस्त.  सगळ्यांना आवडली.  मी आयुष्यात जेवढा कधी खूष झालो नव्हतो तेवढा आज आहे.", पप्पांचा टोन साहजिकच थोडा रडवेला होता

"आई रडली का मुलाला टीव्हीवर बघताना?", मी विचारलं

"सारखी डोळ्याला पदर लावत होती", पप्पानी  हसत सांगितलं.  जेवून येतो असं सांगून मी फोन ठेवला.  विनोद दादाने घरी फोन केला व नंतर मला.  त्याचा फोन तर मला अपेक्षितच होता.  तो हे सगळं करण्यामागचं नेहमीच प्रेरणास्थान आहे.  व्हाट्सअप वर बऱ्याच जणांनी माझी रेकॉर्ड केलेली मुलाखत पाठवली.  काही जणांनी फेसबुकवर माझे फोटो अपलोड केले.  बऱ्याच मित्रांनी त्यांच्या स्टेट्समध्ये माझे फोटो आणि मुलाखतीचे व्हिडीओ अपलोड केले.  सर्व बाजूनी अभिनंदनाचा वर्षाव पुढचे २-३ दिवस होतच होता.  "शुभेच्छा या व्हर्चुअल मेसेजवर न देता त्या प्रत्यक्ष कॉल करून दिल्यावर नातं अजून घट्ट होत", या माझ्या मुलाखतीतल्या वाक्याला सर्वानी दुजोरा दिला आणि आवर्जून कॉल करून शुभेच्छा दिल्या.

एकंदरीत हा अनुभव पूर्ण वेगळा होता.  दूरदर्शनमधला प्रत्येक व्यक्ती ज्यांच्याशी माझा संबंध आला, त्यांनी मला प्रेमाने आपुलकीने वागवले.  प्रत्येक ठिकाणी एक कम्फर्ट फील दिला.  निखिलेशजी आणि विनायकजींनी भेटीच्या  सुरुवातीपासूनच माझ्यात कॅमेरा फेस करण्याचा आत्मविश्वास व मुलाखतीची प्रक्रिया सोपी करण्याचं मोठं काम केलं.  आयुष्यातली एक मोठी पायरी जिकडे मी एकाच वेळी लाखो घरामध्ये पोहचलो, मला सहज पार करता आली.  तिथल्या प्रत्येक व्यक्तीने माझ्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.

आमच्या घरातून टीव्हीवर येणारा तसा मी पाहिला नाही पण एक तज्ञ म्हणून ज्याची मुलाखत घेतली जाते तसा पहिला नक्कीच आहे.  लोकांच अख्ख आयुष्य जिथे येण्यासाठी निघून जात तिथे इतक्या लवकर मला संधी मिळावी ही आमच्या आई बाबांच्या पुण्याईची फळ. 

कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करण्याचा थ्रिल निराळाच असतो.  तो मी अनुभवला व इथे मांडला.  आता माझी कॅमेराशी व तिथल्या बऱ्याच जणांशी मैत्री झालीय.  यापुढे बोलावन आल्यावर मला कोणीच अनोळखी वाटणार नाही.  

होय, मी पुन्हा टीव्हीवर येईन. नक्कीच !!!

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
९२२१२५०६५६

#sahajsaral


Comments

  1. सुबोध खूप उत्तम रित्या मांडला आहेस तुझा अनुभव...तसापण या सगळ्याचा भाग होतोच मी...मुलाखतीला प्रत्यक्ष दूरदर्शन केंद्राला येऊ शकलो नाही. पण हे सगळं वाचून त्याचाही भाग झालोच!
    मला तुझा सदैव अभिमान आहे भावा!

    ReplyDelete
  2. वा मस्त लिहिलं आहेस, असं वाटलं तुझं बोट धरून सारा स्टुडिओ फिरतोय. तू जेव्हा पहिल्यांदा सांगितलंस तेव्हाच "yesssss!!!" असं मनातल्या मनात म्हणून दोन टुणकन उड्या मारल्या मी. आणि ज्या आत्मविश्वासाने तू उत्तरं दिलीस ते तर केवळ लाजवाब. म्हणजे मी घरच्यांना थांबवून ठेवलेलं, रिमोट बळकावलेला हे असं लहानपणानंतर थेट आता केलं. तुझ्या प्रदीर्घ मुलाखतीची प्रतिक्षा आहे.

    ReplyDelete
  3. खुप छान लिहिले आहे! Best wishes!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"उद्योजकतेची दिवाळी"

  "पप्पा, मी यावर्षी पण कंदीलाचा बिजनेस करणार आहे", सार्थक मोठ्या उत्साहात परवा मला सांगायला आला. "कस्टमर कोण? अजय काका?", मी गमतीने विचारले.  गेल्यावर्षी बिजनेसच्या पहिल्या वर्षात अजय काका हा एकच कस्टमर होता. सार्थकला प्रोत्साहन म्हणून त्याने कंदील घेतले आणि पेमेंट म्हणून काही शेअर्स त्याला गिफ्ट म्हणून पाठवले. "यावर्षी अजय काकाला आम्ही पार्टनर म्हणून घेणार. प्रत्येक कंदीलामागे कमिशन देणार", सॉफ्टवेअरमध्ये बिजनेस डेव्हलपमेंटच काम बघणारा अजा, कंदील विकताना कसा दिसेल या कल्पनेने हसू आलं.  अजय काका सार्थकचा हक्काचा माणूस आहे.  आणि अजय काकाला पण सार्थकचं भारी कौतुकही आहे. "परीक्षा संपल्यावर सगळं", मी सार्थकला सांगितलं. आज परीक्षा संपवून घरी आला आणि अण्णासोबत जाऊन त्याने कंदीलाच सामान आणलं. अण्णाकडून मदतीच प्रॉमिस घेतलंच होतं. पार्टनरशिपची ऑफर टाकण्यासाठी अजय काकाला फोन करा म्हणून माझ्या मागे लागला होता. पण हे सगळं त्यानेच करावं हे त्याला मी सांगितलं. फोन लावून त्याच्याकडे दिला पण लाजत असल्याने तो धावत मम्मीकडे गेला. मम्मीनेही माझं बोलणं ऐकलं असल्याम